नांदेड : नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येचा (Sanjay Biyani Murder Case) उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. या हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरही काही आरोपींनी या हत्याप्रकरणी अटक होऊ शकते, असं नांदेड पोलिसांनी (Nanded Police) स्पष्ट केलंय. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रासह एकूण सहा राज्यात पोलिसांनी तपास केला. त्यानंतर या हत्येप्रकरणाचा खुलासा नांदेड पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान, संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेडमध्ये (Nanded Murder) काही जणांनी खंडणीवसुलीचा धंदा सुरु केला होता. धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तसंच अजूनही जर कुणी खंडणीसाठी धमकावत असले, तर अशांनी पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
दि. 5 एप्रिल 2022 रोजी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी कलम 302, 307..34 भा. द. वि. सहकलम 3/25 भा. ह का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे आदेशान्वये एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. सदर एस आय टी चे प्रमुख श्री विजय कबाड़े, अपर पोलीस अधीक्षक भोकर आणि मदतीला श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस निरीक्षक श्री संतोष तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी व्ही माने. पी. डी. भारती, संतोष शेकडे शिवसाब घेवारे, चंद्रकांत पवार पोलीस उपनिरीक्षक दशरथ होते. गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश गोटके असे सर्वजण होते.
तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस छाणे विमानतळ यांचे नाफतीने तपास करणे चालू होते. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.
संजय बियाणींच्या हत्याकांडानंतर या घटनेचा फायदा घेवून खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या विरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलंय.