नांदेडः शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या (Sanjay Biyani) हत्या प्रकरणी नांदेड पोलिसांनी सातव्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पंजाबमध्ये (Punjab) जाऊन नांदेड पोलिसांनी (Nanded Police) आरोपी हरदीपसिंह सपुरे याला आज अटक केली. मूळचा नांदेडचा असलेला हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. तो पंजाबमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीनं आरोपीला पकडल. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपी पकडले होते. आज सातवा आरोप जेरबंद करण्यात आला. येत्या चार दिवसात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
संजय बियाणी यांच्या हत्येमागे दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. रिंदा हा सध्या पाकिस्तानमध्ये असून तेथूनच तो सर्व सूत्र हलवत आहे. नांदेडमध्येही रिंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. मात्र आता असे प्रकार करणारे स्थानिक गुंड पोलिसांच्या रडारवर आहेत.
5 एप्रिल 2022 रोजी नांदेडमधील संजय बियाणी यांची मोटर सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हत्या केली होती. ही घटना त्यांच्या राहत्या घरासमोरच घडली होती. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पोलीस या गुन्ह्यातील अज्ञातांचा शोध घेत होते. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील आरोपींसाठी पोलिसांनी तब्बल सात रराज्यांमध्ये तपास केला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात हा तपास झाला. या कारवाईत आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.