नांदेड : शहरातील प्रसिद्ध जाजू रुग्णालयाचे प्रमुख डॉ. देवानंद जाजू (Dr. Devanand Jaju) यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. बुधवारी दुपारी ही घटना समोर आली. डॉ. जाजू हे मागील 20 ते 25 वर्षापासून सिडको (CIDCO) भागात वैद्यकीय सेवा देत होतो. भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर अशी डॉ. जाजू यांची ओळख होती. दरम्यान, डॉ. जाजू यांनी आत्महत्या (Suicide) का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. जाजू यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहे. त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी डॉ. जाजू यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नांदेड ग्रामीणचेपोलीस निरीक्षक लक्ष्मण राख हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी डॉ. जाजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
डॉ. जाजू यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तशी माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी दिलीय. डॉ. जाजू हे वैद्यकीय सेवेसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यामुळे जाजू यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.