आरड्याओरड्याने आली जाग, चोरांना पाहूनही ती डगमगली नाही, तिच्या धैर्यामुळे फसला मोठा दरोडा

| Updated on: Oct 20, 2023 | 2:08 PM

ग्रामस्थांची रात्र अक्षरश: वैऱ्याची होती. मात्र एका मुलीच्या धैर्यामुळे मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल ठरला. पोलिसांनी ४ शसस्त्र दरोडेखोरांना ताब्यात घेतलं.

आरड्याओरड्याने आली जाग, चोरांना पाहूनही ती डगमगली नाही, तिच्या धैर्यामुळे फसला मोठा दरोडा
Image Credit source: TV9 Network
Follow us on

जितेंद्र बैसाणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नंदुरबार | 20 ऑक्टोबर 2023 : संकट समोर असताना न डगमगता जी व्यक्ती उभी राहते, तीच खरी धैर्यवान ठरते. सध्या नवरात्रौत्सव सुरू आहे. दुर्गेची, देवीची उपासना, पूजा करण्या आणि तिच्याकडून आशीर्वाद घेण्याचा हा सण देशभरात भक्ती-भावाने साजरा केला जातो. नवदुर्गेचे एक रूप विसरवाडीतही पहायला मिळाले. तेथे एका मुलीच्या सतर्कतेमुळे आणि असीम अशा धैर्यामुळे मोठ्या दरोड्याचं (robbery unsuccessful) संकट टळलं.

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे घडलेल्या या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तेथे ग्रामस्थांची रात्र अक्षरश: वैऱ्याची होती. मात्र एका मुलीच्या धैर्यामुळे मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल ठरला. पोलिसांनी ४ शसस्त्र दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. यामुळे गावकऱ्यांच्या जीवावरचं मोठं संकट टळलं. त्या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मध्यरात्री आवाज आला आणि….

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे कुंभार गल्लीत भरवस्तीत असलेले व्यापारी अगरवाल यांच्या घरात मध्यरात्रीच्या सशस्त्र दरोडा पडला. पाच दरोडेखोर अगरवाल यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अगरवाल दांपत्याला दोरीने बांधून मारहाण केली. दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्यांच्या मुलीला आरड्याओरड्याच्या आवाजाने अचानक जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता तिलो दरोडेखोर मारहाण करताना आणि मौल्यवान माल लुटताना दिसले.

मात्र त्या सशस्त्र दरोडेखोरांना पाहूनही ती घाबरली नाही. तशीच लपत-छपत, आवाज न करता ती घराबाहेर निसटली आणि नातेवाईकांच्या घराच्या दिशेने जोरात धाव घेतली. रात्री उशीरा दार वाजल्याने तिचे नातेवाईकही घाबरले आणि समोर मुलीला पाहून तर ते हादरले. त्या मुलीने क्षणाचाही वेळ न गमावता घरात दरोडेखोर शिरल्याचे सांगत सगळा वृत्तांत कथन केला.

हे ऐकून तिचे नातेवाईक एक क्षण हादरले, पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वत:ला सावरत तातडीने पोलिसांना फोन करत माहिती दिली. या दरोडेखोरांची माहिती मिळताच पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी तिथून निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परतेने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

चौघांच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांनी एकूण चार दरोडेखोरांना अटक केली मात्र एक दरोडेखोर निसटून जाण्यात यशस्वी ठरला. एका फरार दरोडेखोरास शोधण्यासाठी पोलिसांनी व सतर्क नागरिकांनी सर्वत्र परिसर पिंजून शोधाशोध सुरू केली. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून तो दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.अटक करण्यात आलेल्या इतर दरोडेखोरांकडून बराच माल जप्त करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान संकटाच्या वेळी डगमगून न जाता, धैर्य दाखव दरोडेखोरांना अटक करण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या नवदुर्गचे सर्वत्र कौतुक होत आहे.