चंदन पूजाधिकारी, नाशिकः लहान बाळाच्या (Small Baby) खेळण्याकडे दुर्लक्ष झालं तर किती अनर्थ घडू शकतो, हे दाखवणारी दुर्दैवी घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. 18 महिन्यांच्या बाळाचा एकाएकी मृत्यू झाला. पण त्यानंतर आणखी गंभीर म्हणजे बाबांच्या चुकीमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आईने केला आहे. बाळाच्या आई (Mother) आणि बाबांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. या वादामुळेच बाळाच्या वडिलांनी घरात मॅजिक बॉल आणल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे.
नाशिकमध्ये सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडली असली तरीही महिलेच्या तक्रारीनंतर ही घटना चर्चेत आली आहे. नाशिक शहरातील मोटवानी रोड भागात हा प्रकार घडला. बाळाच्या मृत्यूसाठी त्याचे वडील जबाबदार असल्याची तक्रार आईने दिली आहे. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाळाच्या आईच्या मते, वडिलांना मेडिकल फील्डची पूर्ण माहिती होती. छोटा मॅजिक बॉल गिळल्याने बालकाचा मृत्यू होऊ शकतो, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मुद्दामहून त्यांनी हा बॉल घरात आणला आणि तो गिळल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला, अशी तक्रार आईने केली आहे.
नाशिक उपनगर पोलीस स्टेशनकडून सदर घटनेचा तपास सुरु आहे. बाळाच्या खेळण्याकडे दोघांचेही दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडलाय का? की महिलेच्या आरोपानुसार, वडिलांनी मुद्दाम हा बॉल मुलाला खेळण्यास दिला, याचा शोध पोलीस घेतली. सध्या तरी पती-पत्नीच्या वादामुळे बाळाकडे दुर्लक्ष होऊन हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.