नाशिक : नाशिकचे कारागृह प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्याचे कारण म्हणजे कारागृहातून रजेवर गेलेला एक कैदी फरार झाला आहे. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. खरंतर नाशिकचे कारागृह नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. यावेळी मात्र रजेवर गेलेला कैदीच फरार झाल्याने कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नाशिकच्या कारागृहात प्रकाश कांतीलाल पंचाळ हा रजेवर गेलेला कैदी परत आलेला नाही. 30 एप्रिल 2021 ला एक महिन्याच्या सुट्टीवर गेलेला कैदी अद्याप पर्यन्त परत न आल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एक महिना उलटल्यानंतर कैदी न आल्याने तात्काळ याबाबत शोध घेणे गरजेचे होते, मात्र वर्ष उलटल्यावर प्रशासनाला जाग आली आहे का ? अशी चर्चा नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात होऊ लागली आहे.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला प्रकाश कांतीलाल पंचाळ हा कैदी फरार झाला असून 2021 मध्ये तो रजेवर गेला होता.
तब्बल वर्षाने कारागृह प्रशासनाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
प्रकाश कांतीलाल पंचाळ हा कैदी गेल्या काही दिवसापासून शिक्षा भोगत होता सदरचा कैदी हा दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गेला होता
त्याची सुट्टी 16 मे 2021 रोजी संपली होती परंतु त्यानंतर सुद्धा तो कारागृहात परतलाच नाही तब्बल एक वर्ष त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो कोठे ही आढळून आला नाही.
त्यामुळे तो फरार झाला असल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच प्रशासनाच्या वतीने इम्रान हमीद सय्यद यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वर्षभराने ही तक्रार का दाखल केली ? कारागृह प्रशासनाच्या कैदी सुट्टीवर असल्याचे लक्षात आले नाही का ? कैदी फरार होणे हा कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार म्हणायचा का ? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले आहे.
याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी एम काकड हे करत आहे.