नाशिकः नाशिककरांना हादरवून टाकणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) खुनप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांना (Police) कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल (DNA report) अजून मिळालेला नाही. त्यामुळे ती हाडे नेमकी कोणाची, हे कोडे अजूनही कायम आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही माहिती दिल्याचे समजते. डॉ. वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली आहे. या साऱ्यांच्या जबाबाच्या सुतावरूनच पोलीस आता तपासाचा स्वर्ग गाठणार असे संकेत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध सुरू केला आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यातले फुटेजही तपासण्यात आले आहे.
झोप उडवणारी घटना…
डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी रोजी, मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे सुद्धा त्यांची असल्याची समजते. वाडीवऱ्हे पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे. खरेच ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासाठीच ‘डीएनए’ अहवालाची वाट पाहिली जात आहे.
सायंकाळपर्यंत ‘ओपीडी’मध्ये
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. मात्र, काही क्षणात होत्याचे नव्हते कसे झाले, अचानक असे काय घडले, याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?