नाशिक | 6 नोव्हेंबर 2023 : नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीच्या (Nashik Crime) घटना प्रचंड वाढल्या असून गुन्हेगारांनी अक्षरश: हैदोस मांडला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा वचकच राहिला नाही का असा प्रश्न पडावाा, अशी परिस्थिती उद्भवली आहे. मात्र गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत.
अशीच एक घटना नाशिकच्या देवळाली गावात घडली. मात्र त्या धक्कादायक घटनेमुळे अख्खं गावच हादरलं असून भीतीच वातावरण पसरलं आहे. देवळाली गावात कटिंगसाठी सलूनमध्ये गेलेल्या तरूणासोबत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ माजली. केस कापण्यासाठी तो तरूण सलूनमध्ये गेला. तेथे निवांत कटिंगही सुरू होतो, मात्र तेवढ्यात ३-४ तिथे घुसले आणि त्यांनी त्या तरूणावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने सपासप वार करत त्याला जखमी केले. या हल्ल्याची भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्यामुळे सर्वांचा थरकाप उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन शेख असे या हल्ल्यातील जखमी युवकाचे नाव आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे अमन हा केस कापण्यासाठी सलूनमध्ये बसला होता. तेथील इसमाशी तो निवांत गप्पाही मारत होता. तेवढ्या तीन-चार जणांच टोळकं अचानक सलूनमध्ये घुसलं आणि काही कळण्याच्या आतच एकाने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
तर दुसऱ्या तरूणाने त्या सलूनमधील इतरांवर वार केले, सलूनच्या सामानाचीही नासधबस करत नुकसान केले. त्यानंतर आणखी एक -दोघे हे कोयत्याने अनवर वार करत राहिले. तो स्वत:ला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होता, मात्र ते तरूण थांबलेच नाहीत. अखेर थोड्या वेळाने धिंगाणा घालून ते तेथून फरार झाले.
या हल्ल्यात अमन शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेला, हाताल गंभीर दुखापत झाल्याचे समजते. त्याला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हल्लेखोर युवकांचाही शोध घेण्यात येत आहे.