अखेर ‘त्या’ सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण ?

| Updated on: Sep 27, 2022 | 2:25 PM

चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका निर्भवणे ही विवाहित महिला गेल्या महिन्यात चांदवड येथील खाजगी रुग्णालयात प्रस्तुतीसाठी दाखल झाली होती.

अखेर त्या सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण ?
pregnancy
Follow us on

नाशिक / उमेश पारीक (प्रतिनिधी) : विवाहितेची प्रसुती दरम्यान चुकीची शस्त्रक्रिया (Surgery) आणि उपचाराने मृत्यू (Death) झाल्याप्रकरणी सहा डॉक्टरांवर आज पहाटे अखेर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. हेमंत मंडलिक (नाशिक), डॉ. दीपक पवार (चांदवड), डॉ. योगिता दीपक पवार(चांदवड), डॉ. रोहन मोरे (पिंपळगाव बसवंत), डॉ. उमेश आहेर (पिंपळगाव बसवंत), डॉ. कविता आहेर (पिंपळगाव बसवंत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे झाला होता महिलेचा मृत्यू

चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका निर्भवणे ही विवाहित महिला गेल्या महिन्यात चांदवड येथील खाजगी रुग्णालयात प्रस्तुतीसाठी दाखल झाली होती. यावेळी डॉक्टरांच्या निष्काजीपणामुळे महिलेची चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नातेवाईकांनी केला होता ठिय्या

यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी थेट चांदवड पोलीस ठाणे गाठत मृतदेह असलेली रुग्णवाहिका नेत ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड

नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तज्ज्ञ समितीने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यात डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड झाला. प्रस्तुती करणाऱ्या डॉक्टरांनी काळजीपूर्वक आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रस्तुती करणे अपेक्षित होते.

सिजेरियन ऑपरेशन केल्यानंतर झालेल्या इन्फेक्शन किंवा गंभीर स्वरुपाचा अपाय होणे किंवा रुग्णाचा मृत्यू होण्याचा संभव लक्षात घेत डॉक्टरांनी काळजीपूर्वक उपचार करणे आवश्यक होते.

मात्र औषध उपचार करताना तिचे आजाराचे योग्य निदान न करता आणि वेळेत उपचार करण्यास विलंब करून हयगत व निष्काजीपणा करून मयतेचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड झाल्याने अखेर आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यान चांदवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 304, 304 अ, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास चांदवड पोलीस करत आहेत.