नाशिक | 2 सप्टेंबर 2023 : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. सुनीता धनगर या 50 हजारांच्या लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या होत्या. त्यांनी एका निलंबित मुख्यध्यापकाला कामावर रुजू करण्याचं पत्र पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केलेली. पण एसीबीने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. याप्रकरणी एसीबीचा गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरु होता. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतली तेव्हा लाखो रुपयांची रोख रक्कम एसीबीच्या हाती लागली होती. याप्रकरणी आता एसीबी आक्रमक झालीय.
एसीबीने लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना आणखी एक दणका दिला आहे. एसीने सुनीता धनगर यांच्याविरोधात बेनामी संपत्ती जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीला या प्रकरणात कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची मालमत्ता आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता धनगर यांनी 96 लाख 43 हजार रुपये इतकी माया अज्ञात स्रोतातून जमवली, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे सुनीता धनगर यांची ईडीकडून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभेतही सुनीता धनगर यांच्या लाचेचं प्रकरण गाजलं होतं. अनेकांनी सुनीता धनगर यांच्या चौकशीची मागणी केली होती. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईडीकडून चौकशी केली जाईल, असं आश्वस्त केलं होतं.
नाशिकमध्ये सातत्याने लाचेच्या घटना समोर येत आहेत. सुनीता धनगर प्रकरणानंतर आणखी काही प्रकरणं समोर आली होती. काही दिवसांपूर्वीच तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आला होता. एकामागे एक अशी प्रकरणं समोर येत आहेत, संबंधितांवर कारवाई देखील होत आहे, असं असताना लाचखोर अधिकाऱ्यांच्या कृत्यांना लगाम लागताना दिसत नाही. त्यामुळे यावर आगामी काळात काही ठोस पावलं उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.