बिजासणी मातेच्या दर्शनासाठी जाताना वाटेतच अग्नितांडव! टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

| Updated on: Nov 29, 2022 | 8:21 AM

एकूण 12 भाविक टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होते, त्याचं काय झालं? चांदवड येथील राहुड घाटात थरार

बिजासणी मातेच्या दर्शनासाठी जाताना वाटेतच अग्नितांडव! टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक
भर रस्त्यात अग्नितांडव
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगाव : बिजासणी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला वाटेतच अचानक आग लागली. या आगीतून वाहनातील प्रवासी अगदी थोडक्यात बचावले. मात्र गाडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीन वर असलेल्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात ही घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असताना अचानक पेटला.

राहुड घाटामध्ये चालकाला वाहनात आग लागली असल्याची शंका आली. त्यामुळे तातडीने टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला उभा केला. यावेळे टेम्पोतील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. बघता बघता आग अधिक भडकली. अवघ्या काही क्षणात संपूर्ण टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाला.

दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धावत घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत टेम्पो पूर्णपणे जळाला होता.

सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एमएच 15 सीव्ही 5188 क्रमांकाचा टेम्पो ट्रॅव्हलरमधून 12 प्रवासी बिजासणी मातेच्या दर्शासाठी निघाले होते. ते नाश्ता करुन पुढच्या प्रवासाला निघाले असता वाटेतच ही दुर्घटना घडली.

टेम्पो ट्रॅव्हलरमधील अग्नितांडवातून सर्व प्रवासी अगदी बालंबाल बचावले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही. चालकाने दाखवलल्या प्रसांगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

अकस्मात आग लागल्याची नोंद चांदवड पोलीस ठाण्यात करण्यात आली. तर सोमा टोल कंपनी येथील अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. भर रस्त्यात टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाल्यानं वाहनाच्या मालकाचं मोठं नुकसान झालंय.