मालेगाव : मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक वादातून टोकडे येथे दोन गटात वाद होऊन दंगल उसळली. लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर झाल्याने यात लहान मुलांसह महिला जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस गावात दाखल झाले. यानंतर गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर काल दुपारी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार हे टोकडे गावात दाखल झाले असता पराभूत पॅनलच्या सदस्य आणि कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. यावेळी दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक वाद झाले. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे गेल्या 25 वर्षांपासून सेनेची सत्ता असून, या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलने सेनेच्या हातातून सत्ता खेचून आणली. 9 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलचे 6 सदस्य निवडून आले. यावेळी सरपंच पदाची थेट निवड होती.
या निवडणुकीत देखील परिवर्तन पॅनलचे सदस्य कैलास देवराम दाभाडे हे 856 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती पॅनलच्या म्हालणबाई मोरे यांचा पराभव केला.
यानंतर गावात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस गावात दाखल झाले. सध्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.