नाशिक : नाशिकमधील शिंदे पळसे टोल नाक्यावरील किन्नर प्रवासी मारहाण प्रकरणी अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तृतीयपंथी आणि प्रवासी दोघांवरही गुन्हा दाखल केला गेलाय. मात्र, या टोल नाक्यावर तृतीयपंथी कायमच दादागिरी करत असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे प्रवाशांवर गुन्हा का दाखल करण्यात आला असा प्रश्न विचारला जातोय. या संदर्भात नाशिकरोड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर आज (17 ऑगस्ट) तृतीयपंथीयांचा राडा बघायला मिळाला. शिंदे टोलनाक्यावर तृतीयपंथी जबरदस्ती प्रवाशांकडे पैशांची मागणी करत होते. यावेळी एका गाडीतील प्रवाशांसोबत त्यांनी वाद घालत बाचाबाची केली. तृतीयपंथीयांनी प्रवाशांना शिवीगाळ केली. नंतर तीन ते चार तृतीयपंथीयांनी मिळून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी देखील तृतीयपंथीयांच्या मारहाणीचा प्रतिकार केला. यावेळी दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
विशेष म्हणजे ही हाणामारी सुरु असताना टोल प्रशासन आणि सुरक्षा रक्षक यांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली होती. तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाला जमिनीवर लोळवत मारहाण केली. या हाणामारीत दोन प्रवासी जखमी झाले. संबंधित घटना घडत असताना टोल नाक्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यापैकी काही जणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात घटना कैद केली. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ आता व्हायरल देखील झालाय.
खरंतय या टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा सुळसुळाटच बघायला मिळतो. प्रवाशांच्या गाड्या अडवणं, त्यांच्याकडे पैशांची मागणी करणं, पैशांसाठी जबरदस्ती आणि दादागिरी करणं, असा सर्रास प्रकार बघायला मिळतो. या दादागिरी करणाऱ्या तृतीयपंथियांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही. याशिवाय टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक असूनही ते काहीच करत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
FIR against transgender who beat passenger in Shinde Palse toll plaza Nashik