नाशिक : बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. सिनेस्टाईल (Cine Style) झटापटीनंतर अखेर 4 जणांना बेड्या (Arrest) ठोकण्यात आल्या आहेत. बनावट ग्राहक बनून जात तस्करांना वनविभागाने रंगेहाथ पकडलं. यावेळी थरारक घटापट झाली होती. पण अखेर हवेत गोळीबार करत तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. आता अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची कसून चौकशी केली जातेय. इगतपुरीच्या वन पथकाने ही कारवाई केली. प्रकाश लक्ष्मण राऊत, परशुमार चौधरी, यशवंत मौळी, हेतू मौळी अशी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयित आरोपींची नावे आहेत.
इगतपुरी वन खात्यातील पथकाला बिबट्याच्या कातडीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी वनविभाग पथकाने सापळा रचला. जव्हार मोखाडा रस्त्यावीरल आंबोली फाट्यावर सोमवारी दुपारी वनअधिकारी आणि कर्मचारी तस्करांना पकडण्याच्या तयारीत होते. ठरल्याप्रमाणे तस्करांना पकडण्यात आलं. पण त्याआधी थरारक झटापट झाली.
हिंदीभाषिक ग्राहक असल्यानं वन अधिकाऱ्यांनी तस्करांना भासवलं होतं. त्यानंतर कातडी देण्यासाठी तस्करांनी बनावट ग्राहक बनलेल्या वन विभागाच्या पथकाला आधी घोटीमध्ये बोलावलं. पण नंतर पत्ता बदलला आणि त्यांना त्र्यबकेश्वर इथं यायला सांगितलं.
त्र्यंबकेश्वरजवळील आंबोली फाट्यावर तस्करी करताना चौघांना रंथेहाथ पकडण्यात आलं. पण आपण पकडले जातोय, हे पाहून तस्करांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केली. यावेळी झालेल्या झटापट आणि मारहाणीमध्ये वनविभागाचे दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार केला आणि चारही तस्करांच्या मुसक्या आवळल्या. एका काळ्या बॅगमध्ये कागदाचे बंडल भरुन नोटा असल्याचंही भासवण्यात आलं होतं. चौघांपैकी एकाने बँगेला हात लावून त्यात कॅश आहे की नाही, ते तपासलं होतं. त्यानंतर हातवारे करत बिबट्याची कातडी आणण्याच्या सूचना केल्या होत्या होत्या. यानंतर ही थरारक झटापट झाली आणि चौघांना अटक करण्यात आली. आता या चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.