लासलगाव (नाशिक) : लासलगाव पोलिसात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांची दखल घेऊन पोलिसांनी तपास केला असता तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांना आरोपींकडून जवळपास पाच दुचाकी मिळाल्या. त्यांची किंमत जवळपास 1 लाख 53 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व गाड्या जप्त केल्या आहेत.
लासलगाव तालुक्यातील विंचूरचे रहिवासी सुभाष गुजर यांची दुचाकी चोरीला गेली. याबाबत त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. दुचाकी चोरीच्या घटनांची सारखी तक्रार येत असल्याची दखल पोलिसांनी घेतली. अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि निफाड उपविभागीय पोलीस उप-अधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन पथके तयार करत तपासाला सुरुवात केली.
तपास सुरु असताना पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथील सोमनाथ धोंडीराम हागवणे आणि विंचूर येथील गणेश बाळू गवळी यांच्याकडे संशयितरित्या दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही संशयितांवर पाळत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. यावेळी आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी फक्त गुन्हाच कबूल केला नाही तर त्यांच्या गैरकृत्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याचीदेखील त्यांनी माहिती दिली.
आरोपींनी लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील संजय उर्फ बाळा छबू पवार याच्या मदतीने आपण लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी तसेच येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडील पाच दुचाकी जप्त केल्या. तसेच तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. आपल्या दुचाकींचे हँडल लॉक व्यवस्थित आहे की नाही याची नियमीत शाहनिशा करुन घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी या निमित्ताने केलं आहे.
हेही वाचा :
दीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका