मालेगाव : नाशिक (Nashik Crime News) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात (Malegaon Murder) एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हत्येची ही घटना उघडकीस आली. जुन्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या मालेगाव पोलिसांकडून (Malegaon Police) या हत्येप्रकरणी पुढील तपास केला जातोय. दोघा फरार संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जातेय.
मालेगाव शहरात गोल्डन नगर भागात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव सलमान अहमद असं आहे. या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना दोघांवर संशय होता. दोन्ही संशयित आरोपी फरार होता. या दोघांनाही मालेगाव पोलिसांनी मनमाड बस स्थानकातून ताब्यात घेतलंय. त्यांची सध्या कसून चौकशी सुरु आहे. संशयितांनी जुन्या वादातून सलमानची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
सलमानची हत्या धारदार शस्त्राने वार करत करण्यात आली होती. कोयत्याने सलमानवर मारेकऱ्यांनी हल्ला केला. यात सलमानच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि बरगडीवर जबर मार बसला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी सलमानचा जागच्या जागीच मृत्यू झाला. हल्ला झालेल्या ठिकाणीच सलमान ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला केल्यानंतर मारेकऱ्यांनी दुचाकीवरुन पळ काढला होता.
अखेर या हत्याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पवारवाडी पोलिसांनी तातडीनं या घटनेचं गांभीर्य ओळखून तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपासात दोघे जण पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघा संशयितांना मनमाड बस स्थानकावरुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्याची हत्या करण्यात आली, तो देखील संशयित आरोपी आहे. चोऱ्या, घरफोड्या असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच ते सात गुन्हा त्यांच्यावर दाखल होते, अशीही माहिती समोर आलीय. आता या हत्येमागे नेमकं कारण काय आहे, याचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.