मालेगाव : लहान मुलं कधी कुठे काय करतील, याचा नेम नाही. रांगणाऱ्या वयात लहान मुलांकडे जराही दुर्लक्ष (baby Caring) करणं फार महागात पडू शकतो. नाशिकमध्ये (Nashik News) घडलेली घटना ही लहान मुलांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच आहे. एका आठ महिने वय असलेल्या बाळाच्या (Nashik 8 months baby) हाताला एक वस्तू लागली. सवयीप्रमाणे चिमुकल्यानं तोंडात घातली. कुणाला काही कळायच्या आतच त्याने ती गिळूनही टाकली. चकीत करणारी बाब म्हणजे जेव्हा तब्बेत बिघडली आणि चिमुकल्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, तेव्हा एक्स-रे रिपोर्टमधून जी गोष्ट समोर आली, त्याने या चिमुकल्याच्या मम्मी-पप्पांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नाशिकमध्ये आठ महिन्याच्या मुलाने चक्क नेलकटरच गिळलं होतं. नाशिक रोडच्या के जी मेहता या परिसरात सोमवारी ही घटना घडली. लहानग्याची तब्बेत बिघडली म्हणून त्याचे आईवडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी मुलाचा एक्सरे रिपोर्ट काढला. हा रिपोर्ट पाहून डॉक्टरही बुचकळ्यात पडले. चिमुकल्याच्या गळ्यात नेलकटर अडकल्याचं रिपोर्टमध्ये दिसून आलं होतं.
काहीही करुन नेलकटर तर काढावं लागणार होतं. तातडीने ऑपरेशन करण्याची गरज होती. चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात आले होते. पण तिथे काही ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. अखेर जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
आईवडिलांनी जरासाही वेळ दवडला नाही. तातडीने मेडिकल कॉलेजात ते चिमुकल्याला घेऊन पोहोचले. एक तासाचं ऑपरेशन करण्यात आलं. चिमुकल्याचा शरीराला कोणतीही इजा न करता नेलकटर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने बाहेर काढलं आणि चिमुकल्याला जीवदान दिलं. या ऑपरेशन नंतर पालकांचाही जीव भांड्यात पडला.
साधरण काल रात्री कॅज्युलिटीमधून डॉक्टरांना इमर्जन्सी फोन आला. या चिमुकल्या बाळाचं नाव आशिष होतं. मेडिकल कॉलेजमधील डॉ. हेमंत आणि एनेस्थेशिया टीमने ऑपरेशनला सुरुवात केली. पुढच्या दातांपासून 22 सेंटीमीटर अंतरावर असलेलं हे नेलकटर अडकलं होतं. दुर्बिणीच्या साहाय्याने डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलं आणि नेलकटर बाहेर काढलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
नाणी, पेनाचं टोपण, या गोष्टी चिमुरड्यांनी गिळल्याचे अनेक प्रकार याआधीही पाहायला मिळाले आहेत. पण चक्क नेलकटरच आठ महिन्यांच्या बाळाने गिळल्यानं डॉक्टरांसमोरचं आव्हानही वाढलेलं होतं. सुदैवानं वेळीच उपचार मिळाले, म्हणून चिमुकल्या अक्षयचा जीव थोडक्याच वाचलाय.
दरम्यान, या घटनेनं लहान मुलांच्या पालकांना, लहान मुलांची काळजी घेणाऱ्यांना एक मोठा धडाच दिलाय. लहान मुलांवर अगदी बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जातेय. थोडंसं दुर्लक्ष जरी झालं, तरी पश्चाताप करण्याचीही वेळ निघून जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सतर्कता बाळगून लहानग्यांची काळजी घ्यावी, त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावं, असं जाणकार सांगतायत.