नाशिक : सिन्नर येथील मोहदरी घाटात शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. तर 4 जण जखमी झाले आहेत. टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली. लग्नावरुन परतत असणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या कारवर काळाने घाला घातला.
नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी एका स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून ते परतत होते. त्यावेळी मोहदरी घाटार संध्याकाळच्या सुमारास शुक्रवारी त्यांची कार अपघातग्रस्त झाली.
भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटले आणि हा अपघात घडला. स्विफ्ट कारमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने आणि वेग वाढल्याने हा अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपासही केला जाणार आहे. स्विफ्ट कारची प्रवासी क्षमता मुळात 5 इतकीच आहे.
लेन ओलांडून विरुद्ध दिशेला कार घुसल्यामुळे या अपघाताची तीव्रता आणखी वाढली. समोरुन येणाऱ्या वाहनांना या कारने जोरदार धडक दिली. समोरुन येणारी आणखी एख स्विफ्ट कार आणि इनोव्हा कार यांना धडक बसल्यानं तिन्ही गाड्याचं मोठं नुकसान झालं.
समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातातील तीन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अजूनही पटलेली नाही. सायली पाटील, प्रतीक्षा दगू घुले आणि शुभम तायडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जखमींवर सिन्नर आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातातामुळे पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.
दरम्यान, गुरुवारी नाशिक-पुणे हायवेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू झालेला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये झालेल्या आणखी एका भीषण अपघातामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न अधोरेखित केलाय.