नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर शोध लागला आहे. या तरुणाचा मृतदेह (Nashik Dead body) पोलिसांच्या हाती लागलाय. हा तरुणा डोंगरावरुन पडून मृत्यूमुखी पडला. 75 मीटर उंचीवरुन डोंगरावरुन खाली पडून या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाशिक जिल्ह्यातील वणी (Vani Nashik News) येथील वाघे या डोंगरवरुन पडल्यानं या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव दौलत गांगुर्डे असून तो 16 वर्षांचा होता. गेल्या तीन दिवसांपासून या तरुणाचा शोध सुरु होता. या तरुणाच्या मृत्यूबाबत कळल्यानंतर गांगुर्डे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
रविवारी सकाळी पोलिसांना एक मृतदेह आढळ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतली. काही ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता वाघेऱ्या या डोंगराच्या मध्यावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. वणी पोलिसांनी ग्रामस्थांची मदत घेत अखेर हा मृतदेह डोंगरच्या पायथ्याशी आणला.
गेल्या तीन दिवसांपासून हा तरुणा बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला जात होता. नातेवाईंकांनी सर्वत्र त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणाचा काही ठावठिकाणा लागला नाही. अखेर शोधाशोध केल्यानंतर या मृत तरुणासोबत असलेल्या त्याच्या मित्राचं नाव पोलिसांना कळलं. त्याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय.
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अकस्पात मृत्यूची नोंद केली आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टेम करत हा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी याबाबतची संपूर्ण चौकशी आणि कारवाई केली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.