नाशिकमध्ये माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात एका 8 वर्षाच्या मुलाला दुकानदाराकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या मुलाकडून दुकानातील साहित्य पडले आणि त्याच रागात दुकानदाराने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी दुकानदारासह दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक शहरातील सिडको परिसरात ८ वर्षाच्या चिमुकल्याला दुकानदाराने आणि त्याच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या बहिणीसोबत पीडित मुलगा हा रायगड चौकातील लकी जनरल स्टोअर्स या दुकानात नोटबुक घेण्यासाठी गेला होता. मात्र दुकानाच्या काऊंटरवर असलेल्या साहित्याला या मुलाचा धक्का लागला. त्यामुळे काऊंटरवरील साहित्य खाली पडले. या क्षुल्लक कारणावरुन दुकानदार जमदार अन्सारी आणि त्याचा मुलगा बशीर अन्सारी या दोघांनी त्या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
धक्कादायक म्हणजे या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलाचे वडील अभिजित पाटील यांनाही दुकानदार आणि त्याच्या मुलाच्या मित्रांनी मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.
या संपूर्ण घटनेनंतर संशयित आरोपी जमदार अन्सारी आणि बशीर अन्सारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी दोन फरार असलेल्या संशयितांचा शोध सुरू केला आहे. तसेच या मुलाचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर संबंधित संशयतांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान नाशिकमध्ये 8 वर्षाच्या चिमुकल्याला लाथा-बुक्क्यांनी, बुटाने आणि दोरीने मारहाण केलेल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात तो गंभीर जखमी झाल्याचेही दिसत आहे. या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणावरुन सध्या नाशिककरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अवघ्या ८ वर्षाच्या मुलाला अशाप्रकारे निर्दयीपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त केला जात आहे.