नाशिक : इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला सापडल्या. यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. नाशिक पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली. (Nashik Igatpuri Resort Rave Party Bigg Boss Fame Actress found with 22 others)
इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.
रेव्ह पार्टीमध्ये 22 जणांचा समावेश
स्काय ताज विलामध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचं छापेमारी समजलं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही यात समावेश आहे. एकूण 22 जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं होतं.
बॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ज पार्टीसाठी अटक
दुसरीकडे, वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी मुंबईत अटक करण्यात आली होती. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली होती. बॉलिवूडमध्ये लहान मोठे रोल करणाऱ्या या अभिनेत्रीला पोलिसांनी पकडलं होतं.
अभिनेत्रीला मित्रासोबत अटक
पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे.
जामिनावर मुक्तता
तिचा साथीदार आशिक हुसैन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला. दोघांना कोर्टात हजर केलं असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तिने आतापर्यंत बॉलिवूडसह काही तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे.
संबंधित बातम्या :
बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अटक
बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा
(Nashik Igatpuri Resort Rave Party Bigg Boss Fame Actress found with 22 others)