मालेगाव : नाशिक (Nashik Crime news) जिल्ह्यातील सटाणा ग्रामीण (Satana Rural Hospital) रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली. एका गर्भवती (Pregnant Women) महिलेला रुग्णालयात उपचार नाकारण्यात आले. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. दुर्दैवी बाब म्हणजे या महिलेने जो जीव पोटात वाढवला होता, त्या तान्ह्या बाळाने जग पाहण्याआधीच जगाचा निरोप घेतला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच घडलेल्या या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
एका गर्भवती आदिवासी महिलेला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार नाकारण्यात आले. या गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून घेण्यासही नकार देण्यात आला होता. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच संबंधित महिलेची प्रसूती होऊन नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय.
या दुर्दैवी घटनेमुळे माणुसकी कुठे पुरून ठेवलीये, असा सवाल उपस्थित केला जातोय. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी लोकांकडून केली जातेय.
सटाणा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयाला चक्क कुलूपच ठोकलं. महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात अल्पवयीन युवतीचा अवैध गर्भपात करण्यात आला होता.
अवैध गर्भपातप्रकरणी कंत्राटी तत्त्वावरील स्त्री रोग तज्ज्ञाला निलंबितही करण्यात आलं. संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता सटाणा ग्रामीण रुग्णालय आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
मालेगाव तालुक्यातील जुनी शेमळी येथील मनीषा समाधान सोनवणे या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे ती ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. परंतु, वैद्यकीय अधिकारी नसल्याचं कारण सांगून तिला मालेगाव किंवा कळवण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले.
आपल्याला प्रचंड वेदना होत आहेत, प्रकृती बिघडत चालली आहे, अशी विनंती महिला तसेच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना केली. परंतु, कुणीही दाद दिली नाही, असा आरोप करण्यात आलाय. या सगळ्यात फार इतका उशीर झाला की गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती झाली. दुर्दैवी बाब म्हणजे काही वेळातच नवजात अर्भकही दगावले. यामुळे नातेवाईक तसेच गावकरीही संतापले. आता दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.