मालेगावः आजेसासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेचा विजेचा शॉक (electric shock) लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सावकी (ता. देवळा) येथे घडली आहे. आकांक्षा कचवे असे मृत महिलेचे (woman) नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकांक्षा यांचे लग्न दीड वर्षापूर्वी देवळातल्या सावकी येथील कचवे कुटुंबात झाले होते. आकांक्षांच्या आजेसासूचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यसंस्कार आटोपून आकांक्षा घरी आल्या. कुटुंबातील सगळ्यांनी अंघोळी केल्या. घरातील कपडे धुणे झाल्यानंतर आकांक्षा ते वाळत टाकत होत्या. मात्र, कपडे वाळत टाकण्याच्या तारेत अचानक विजेचा प्रवाह उतरला. याचा जोरदार धक्का आकांक्षाला लागला. त्यांचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला. एकाच घरात लागोपाठ असे दोन आघात बसल्यामुळे कचवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यात नवदाम्पत्याचा संसार असा अर्ध्यावर मोडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबावर पसरली शोककळा
कचवे कटुंबातील एका ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर अनेक नातेवाईक आपल्या घरीही पोचले नव्हते. तितक्यात कचवे कटुंबातील सुनेच्या निधनाची वार्ता आली. हे ऐकुण नातेवाईकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ कचवे यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते. मात्र, विजेच्या धक्क्याचा प्रकार समजताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. एकापाठोपाठ एक बसलेल्या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.
वीज कंपनीचा गलथान कारभार
कचवे कुटुंबात कोसळलेल्या या संकटाला वीज कंपनीचा गलथान कारभार जबाबदार आहे, असा आरोप गावकरी करत आहेत. अशीच घटना नेमकी धुळवडीच्या दिवशी पंढपुरातल्या चळेगावात घडली होती. दुपारच्या सुमारास चळे तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याने नवीन मोटार घेतली होती. सणाच्या दिवशी मोटार लावण्याचे प्रयोजन होते. यासाठी दोघांना बोलावण्यात आले होते. यावेळी मोटार लावताना पाण्यात विद्युत प्रवाह उतरला. त्यात राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोन्ही तरुणांची कुटुंबे उघड्यावर आली होती. आताही तशीच घटना घडल्याने संताप व्यक्त होतोय.