उमेश पारीक, प्रतिनिधी, लासलगाव (नाशिक) : चोरीच्या घटना घडतात. मात्र लासलगाव येथे चक्क एटीएम उचलून नेल्याची घटना घडली. एटीएम मशीन उचलण्यासाठी चौघांनी एकमेकांची साथ दिली. मशीन काढले. त्यानंतर चार चाकी गाडीत टाकले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी पाठलाग केला. चोरट्यांनी एटीएम मशीन फेकून पळ काढला. या घटनेत पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील विंचूर रोडवर चोरीची घटना घडली. ॲक्सिस बँकेच्या शेजारीच असलेल्या एटीएम हे पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
चार चोरटे चारचाकी गाडी घेऊन या एटीएम मशीनजवळ आले. दोन जणांनी एटीएम मशीन हलवून पाहिले. एटीएम मशीन उचलून चारचाकी गाडीत मांडले. चौघांनी एटीएम मशीन चारचाकी गाडी टाकून तेथून पोबारा केला.
मात्र एटीएम मशीन चोरी झाल्याचे अलर्ट बँकेच्या हेडला कळले. त्यांनी त्वरित लासलगाव पोलिसांना माहिती दिली. त्वरित लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे गाडी कोणत्या दिशेने गेली ही बाब लक्षात घेतली.
हवालदार योगेश शिंदे, पोलीस नाईक सुजय बारगळ यांनी त्वरित सीनेस्टाईल पाठलाग केला. मात्र पोलीस येत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने चोरट्यांनी गाडीतून एटीएम मशीन ढकलून दिले. तेथून पळ काढला. पोलिसांनी एटीएम मशीन ताब्यात घेतले.
याबाबत लासलगाव पोलीस स्थानकात संबंधित चोरट्यांचा अधिक तपास सुरू आहे. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपास लासलगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.