नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने पोलीस आयुक्तालयाबाहेरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तक्रार घेत नसल्याचे आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळेच आपण आत्मदहन करत असल्याचं महिलेने म्हटलं आहे. राजलक्ष्मी पिल्ले असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या महिलेला पोलिसांनी आत्मदहन करण्यापासून रोखलं.
आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला राजलक्ष्मी पिल्ले या युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. राजलक्ष्मी यांनी आपल्या पतीसोबत नाशिक पोलीस आयुक्तलयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून आपल्याला मारहाण झाली. याबाबत आपण इंदिरा नगर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करण्यासाठी जावूनही पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही, असा आरोप राजलक्ष्मी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाबाहेर पतीसोबत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
राजलक्ष्मी यांचा आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत राजलक्ष्मी स्वत:वर कशाप्रकारे पेट्रोल ओतून घेतात ते स्पष्टपणे दिसत आहे. तसेच पोलीस राजलक्ष्मी आणि त्यांचे पती दोघांना आत्मदहन करण्यापासून रोखत आहेत. यावेळी राजलक्ष्मी आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. “माझ्यावर अन्याय झाला आहे. मी थांबनार नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊनही माझी तक्रार नोंदवली गेली नाही. मी थांबणार नाही”, असं राजलक्ष्मी बोलताना दिसत आहेत. अखेर राजलक्ष्मी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.