येवला : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Murder) येवला तालुक्यात एका मुस्लिम मांत्रिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हत्या करण्यात आलेली व्यक्ती मूळची अफगाणिस्तानातली होती. मंगळवारी ही घटना घडली. येवला तालुक्यातील चिंचोडी येथील एमआयडीसी परिसरात घडलेल्या या हत्येच्या घटनेनं एकच खळबळ उडाली. या हत्येप्रकरणी (Yeola Crime News) येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून (Nashik Crime News) या हत्याप्रकरणाचा तपास केला जातोय. धार्मिक कार्यातून ही हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. भर रस्त्यातच हे हत्याकांड घडलं. यानंतर हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.
येवला तालुक्यात अफगाणिस्तानमधून आलेल्या मुस्लिम मांत्रिक सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती या 35 वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. धार्मिक कार्यातून त्याची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. तीन ते चार जणांनी येऊन सैय्यद जरीफ चिश्ती याच्यावर गोळ्या झाडल्या. यात चिश्ती या विदेशी नागरीकाचा जागीच जीव गेला. संपूर्ण येवला तालुका या घटनेनं हादरुन गेलाय. या घटनेप्रकरणी रात्री उशिरा येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिघांविरुद्ध येवला शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास आता केला जातोय. सैय्यद जरीफ चिश्ती याला कपाळावार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याच्या कपाळावर गोळी लागल्याचे गंभीर घाव आढळून आले. यात चिश्ती याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्व मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. चिश्तीला गोळ्या घातल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्याजवळ असलेली एसयूव्ही गाडीही हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरुन फरार झाले.
लूटमारीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आली की आणखी धार्मिक कार्यातून, याचा तपास आता येवला पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान, या घटनेनंतर फरार मारेकऱ्यांना पकडण्याचं आव्हानही पोलिसांसमोर आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती काढत आता पोलिसांनी या हत्याप्रकरणाता तपास सुरु केलाय.