नाशिकः धर्म आणि श्रद्धेचा फायदा कोण कसा वसूल करेल याचा नेम नसतो. त्यामुळे नारायण नागबळीच्या नावाखाली हजारो रुपयांना लुबाडले जाते. या विधी, कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकले, तर अनेक जणांना कर्जबाजारी व्हायलाही वेळ लागत नाही. याच्याच विरोधात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी (Jyotiba Phule) महाराष्ट्रात (Maharashtra)आवाज उठवला. मात्र, काही केले तरी हे प्रस्थ कमी होताना दिसत नाही. विशेषतः शिकले-सवरलेले लोकही या जाळ्यात फसतात. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे वेगळे. मात्र, तिचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले की, तुमच्याकडून वसुली करायला अनेकजण टपलेले असतात. नेमके असेच प्रकरण नाशिकमध्ये (Nashik) होताना दिसतेय. येथे पुन्हा एकदा पुरोहितांमध्ये वाद उफाळून आलाय. कारण काय, तर एकाचे पूजेसाठी आलेले यजमान दुसऱ्याने पळवले. मग खरेच अशा पूजा करून आपल्या पदरात कितपत पुण्य पडेल, ही गोष्ट अलहिदा.
त्याचे झाले असे की…
नाशिक महाराष्ट्रातली काशी. मंदिराचे शहर म्हणून ख्याती. जवळच त्र्यंबकेश्वर. निवृत्तीनाथ महाराजांनी येथेच समाधी घेतली. वारकरी संप्रदायात त्यांचे महत्त्व अनन्य साधारण. या कर्मकांडाविरोध पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांनी आवाज उठवला. मात्र, त्यांचे बंधू जिथे चिरसमाधीत विलीन आहेत तिथेही हा धर्म, श्रद्धा आणि कर्मकांडाचा बाजार फोफावलेला दिसतोय. त्यातूनच नाशिकमध्ये पुरोहितांमध्ये वाद उफाळून आलाय. एकाचे पूजेसाठी आलेले यजमान दुसऱ्याने पळवले. यामुळे हे भांडण रंगले आहे. या पूजापाठात हजारो रुपये पुरोहितांना मिळतात. त्यामुळे यजमानाची पळवापळवी होते. त्यात भाविक मात्र अक्षरशः लुबाडले जातात.
कालसर्प पूजेवरून हाणामारी
नाशिकमध्ये यापूर्वी कालसर्प पूजा कोणी करायची यावरून हाणामारी झाली होती. नागपूरचे एक भाविक आलेले. त्यांना कालसर्प पूजा करायची होती. त्यासाठी भांडण करणाऱ्यांपैकी एका पुजाऱ्याने 11 हजार रुपये सांगितलेले. इतकी रक्कम ऐकुण भाविक गांगारले. साहजिकच त्यांनी दुसऱ्याकडे धाव घेतली. भांडण करणाऱ्या दुसऱ्या पुजाऱ्याने ही पूजा कमी रकमेत केली. त्यामुळे दोन्ही पुजाऱ्यांमध्ये भांडण जुंपले. दोघेही पंचवटीतल्या हिरावाडीमध्ये राहतात. त्र्यंबकेश्वरमधून येताना वादावादी झाली. ही दोन्ही कुटुंबे हिरावाडीत आल्यानंतर चक्क तुंबळ हाणामारी रंगली. त्यामुळे परिसरातील लोकही आश्चर्यचकित झाले.
त्र्यंबकेश्वरमध्ये यापूर्वी मंदिराचे पूजक व पुजाऱ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला. तक्रारदार पुजारी कैलास देशमुख यांचे असे म्हणणे आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा सुरू होती. यावेळी यावेळी पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी पूजा साहित्य अस्वच्छ असल्याचे म्हणत शिवीगाळ केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी घंटा फेकून मारली. भांडण वाढू नये म्हणून देशमुख मंदिराच्या बाहेर पडले. मात्र, शुक्ल यांनी पूजा सोडून त्यांचा पाठलाग केला. त्यांना मंदिराबाहेर येऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, कैलास देशमुख यांनी देवस्थान ट्रस्टच्या कोठडीत येत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विश्वस्त ललिता शिंदे ही उपस्थित होत्या. देशमुख यांनी पूजा सुरू असताना अडथळा आणला. धार्मिक परंपरा मोडीत काढल्याचाही आरोप केला आहे. हे सारे वाद, भांडणे पाहता आता भाविकांनी अंर्तमुख व्हावे. देव माणसात आणि स्वतःत पाहावा. मग अशी फसगत होण्याचीही पाळी येणार नाही. नाही का?
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!