नाशिकः संरक्षण खात्याचा कणा असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या ओझर येथील ‘एचएएल’ (HAL) च्या प्रतिबंधित क्षेत्रात (restricted area) 2 तोतया अधिकाऱ्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बनावट ओळखपत्र दाखवून हे तोतया घुसखोरीच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांचे वेळीच बिंग फुटले. याप्रकरणी पालघर विक्रमगड येथील एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या संशयिताला ओझर येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मनोज पटेल उर्फ अबू हसन सलीम पठाण (वय 37, रा. सारडा सर्कल, नाशिक), आणि हर्षल रमेश भानुशाली (रा. विक्रमगड, जि. पालघर) अशी या भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांचीही पोलिसांनी चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मास्टरमाइंड कोण?
ओझर येथील ‘एचएएल’ च्या प्रतिबंधित क्षेत्रात दोघे घुसले. मात्र, त्याचा मास्टरमाइंड दुसराच असल्याचे समजते. त्याचा शोध घ्यायलाही पोलिसांनी सुरुवात केली आहे. नेमके त्यांना येथे काय करायचे होते, त्यांचा कट काय होता, याचा तपास पोलिसांनी सुरू आहे. नाशिकमध्ये यापूर्वीही तोतया अधिकारी, तोतया लष्करी अधिकारी म्हणून अनेक जण फिरत होते. यातल्या दोघांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे विशेष.
देवळाली कॅम्पमध्येही प्रकार…
देवळाली कॅम्प येथील लष्करी हद्दीत मोठ्या थाटात लष्करी गणवेश घालून, गाडीवर लष्कराचे लोगो लावून एक भामटा काही दिवसांपूर्वी वावरत होता. या भामट्याला देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल गेटजवळ आडवले. तेव्हा त्याने तिथे सुभेदार रामप्पा बनराम यांना आपण लष्करात नोकरीसाठी असून, हरियाणाच्या इस्सार येथील 115 फिल्ड रेजिमेंटमध्ये पोस्टिंग असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली. त्याच्याकडे कुठलेही अधिकृत ओळखपत्र नव्हते. त्याच्याविरोधात सुभेदार रामप्पा बनराम यांच्या तक्रारीवरून गणेश पवारविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरोजगारांसह बँकेला लाखोंचा गंडा
गणेश पवार पवार हा भामटा लष्करी गणवेशात रहायचा. बेरोजगारांना लष्करात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवायचा. त्याने काही जणांकडून 32 लाखांच्या वर रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. पवारकडे लष्करी मुख्यालयाच्या नावाचा बनावट रबरी शिक्का, चारित्र्य प्रमाणत्र आणि नोकरी विषयक इतर बनावट कागदपत्रे आढळली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे त्याने चांदवडमधील एका बँकेतून बनावट कागदपत्रांचा वापर करत 39 लाखांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे.
वडील, पत्नीलाही फसवले
गणेश पवारचे वडील वाळू पवार हे लष्करातून सेवानिवृत्त झालेत. त्यांनाही गणेशने फसवले. आपण लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याचे सांगितले. या बातमीने त्यांचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी गावात त्याचा सत्कार केला. सगळ्या गावाला गावजेवण दिले. त्यावर पावणेदोन लाख रुपये खर्च केले. मात्र, त्याने त्यांनाही फसवले. गणेशचे स्वतःचे बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्याची पत्नी बीएससी शिकलेली आहे. 2017 च्या बॅचमध्ये आपण लेफ्टनंट झाल्याची थाप मारत त्याने सटाणा येथील गीतांजली यांच्यासोबत जानेवारीमध्ये लग्न केले. विशेष म्हणजे तिलाही शेवटपर्यंत आपले खरे रूप कळू दिले नाही.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!