मनोहर शेवाळे, मालेगाव : नाशिकच्या नांदगाव (nashik nandgaon) तालुक्यात काल ट्रॅक्टर चोरीची (Tractor stolen) घटना ताजी असताना तालुक्यातील जळगाव-बुद्रुक (jalgaon budruk) येथील शेतकरी सुदाम आहिरे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील जवळ पास 25 ते 27 शेळ्यांची रात्रीत चोरी झाली आहे. अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आलीय. सुदाम आहिरे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या शेतात छोटेसे पत्र्याचे शेड तयार करुन त्यात लहान-मोठ्या अशा 25 ते 27 शेळ्या पाळल्या होत्या. याबाबत त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये चोर झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून याची चौकशी सुरु आहे.
शेतकरी सुदाम आहिरे यांचा शेळी पालन करण्याचा व्यवसाय आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून ते शेती करीत शेळीचं पालन करीत आहे. काल मध्यरात्री चोरट्यांनी शेडला लावलेलं कुलूप तोडून त्यातील शेळ्या चोरुन नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी सुदाम आहिरे पुर्णपणे हतबल झाले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालन या व्यवसायावरती असल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा प्रसंग उभा राहिला आहे.
काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेडचे कुलीप तोडून सगळ्या शेळ्या पायी चालवत डोंगर पार करत त्या कसारी घाटापर्यंत नेल्या आणि तेथून त्या वाहनातून नेल्या असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला असून याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व शेळ्यांची किंमत 1 लाख 76 हजार रुपये असल्याच शेतक-याने सांगितलय.
नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसात चोरीच्या घटनात अधिक वाढ झाली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ट्रॅक्टरची चोरी झाल्यानंतर लगेच शेळ्यांची चोरी झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं आहे. पोलिस विविध मार्गानी या घटनेचा तपास करीत आहे.