नाशिक : नाशिकमध्ये आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले आहे. सुरुवातीला एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू केली होती. यावरून हर्षल मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रोसिटीसह पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये तपास करत असतांना त्याने आणखी पाच अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेनं पोलीसांनी कठोर पाऊले उचलून अधिकचा तपास सुरू केला आहे.
नाशिकच्या ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर संचालकाकडून अत्याचार केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती.
या प्रकरणाचा तपास करत असतांना आणखी मुलींचा जबाब नोंदवण्यात आला होता. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पाच मुलींच्या जबाबातून लैंगिक अत्याचाराची बाब समोर आली.
संशयित आरोपी हर्षल मोरे याने तक्रारदार मुलीसह आणखी पाच मुलींवर अत्याचार केल्याची बाब मुलींच्या जबाबातून समोर आल्याने संपर्ण नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी हर्षल मोर याने आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिग अत्याचार केल्याचे तक्रारदार मुलींचा म्हणणं आहे, पोलीसांनी केलेल्या समुपदेशनात समोर आले आहे.
कथित आधार आश्रमाच्या कागदपात्रांच्या संदर्भात देखील धक्कादायक बाब समोर आली आहे, यामध्ये फक्त चॅरिटेबल ट्रस्टची परवानगी असून इतर कुठलीही परवानगी नसल्याचं पोलीसांच्या तपासात समोर आले आहे.