नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा (Dr. Suvarna Waje) वाजे यांच्या जळीतकांडाप्रकरणी रोज खुलाशामागून खुलासे समोर येतायत. मात्र, या प्रकरणाचा गुंता काही केल्या सुटायला तयार नाही. एकीकडे डॉ. सुवर्णा वाजे यांना ठार मारण्यातला प्रमुख संशयित आणि मास्टरमाईंड संदीप वाजे म्हणावे तसा घडाघडा बोलत नाही. शिवाय त्याला खुनप्रकरणात (Murder) मदत करणाऱ्या त्याच्या मित्रापर्यंत पोलिसांचे हात अजून पोहचत नाहीत. कारण संदीप वाजेच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे. मात्र, त्याच्याविरोधात ठोस पुरावेच सापडत नसल्याने पोलिसांचीही कोंडी झाल्याचे समजते. आता विशेष म्हणजे डॉक्टर सुवर्णा वाजे यांच्या कुटुंबाची पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केलीय. त्यातून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीतून पुन्हा पुराव्यांची जुळवाजुळव करणे सुरू आहे. त्यात अजून एक खुलासाही समोर आलाय.
नवीन खुलासा काय?
डॉ. सुवर्णा वाजे यांना पतीने अतिशय थंड डोक्याने क्रूरपणे संपवले. त्यासाठी नियोजनबद्ध रितीने कट केला. डॉ. सुवर्णा वाजे 25 जानेवारीच्या रात्री काम संपवून क्लिनिकमधून बाहेर पडल्या. त्या मुंबई-आग्रा महामार्ग परिसरालगत पोहचल्या. हे सारे त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून समोर आले. आता पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच दिवशी रात्री डॉ. सुवर्णा वाजे ज्या वेळेस त्या भागात पोहचल्या होत्या, त्यावेळेस संदीपही तेथे असल्याचे समोर येत आहे. संदीपच्या मोबाइलचे लोकेशनही त्यादिवशी मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात आढळले आहे. त्यामुळे संदीप भोवतीचा फास आणखी एकदा घट्ट झाला आहे.
डॉ. वाजेंना का संपवले?
संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याच्याकडे इतका पैसा नव्हता. यावरून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद विवाद व्हायचे. त्यामुळे त्याने डॉ. सुवर्णा वाजे यांचा काटा काढायचे ठरवले. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला पती संदीपने नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले. त्यांचा खून करून इतर पाच जणांना सोबत घेत पत्नीला जाळले. दुसरीकडे संदीपने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तो रिकव्हर झाला असून, त्यातूनही त्यांच्यात भांडण आणि वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
चिठ्ठी महत्त्वाची ठरली
डॉ. सुवर्णा वाजे यांना संदीपने एकदा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही सारी माहिती क्लिनिकमधील सहकाऱ्यांना सांगितली होती. संदीपकडे पोटगीसाठी पन्नास लाखांची मागणी केल्याचीही माहिती दिली होती. आपले कधी काही बरेवाईट झालेच, तर क्लिनिकमध्ये ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना द्या, असे सांगितले होते. त्यावरून डॉ. सुवर्णा वाजे यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती आणि चिठ्ठी पोलिसांना दिली आहे. त्यातून या साऱ्या प्रकरणाचा अजून खोलवर उलगडा झाला आहे.
संदीपनेच बोलावून घेतले
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या आहेत.