नाशिक : अलिकडच्या काळात ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला जातोय. त्याचे कारण म्हणजे वेळ वाचतो आणि झटपट पैसे भरून एक काम पूर्ण होते. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असल्याने अनेकांचा कल हा ऑनलाइन व्यवहार करण्यावर असतो. मात्र, याचाच फायदा घेऊन काही भामटे नागरिकांना चुना लावत आहे. नुकताच नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ऑनलाइन वीज बिल भरण्याच्या नादात एका भामट्याने महिलेला सव्वा दोन लाख रुपयांना चुना लावला आहे. आपली ऑनलाइन फसवणूक झाली आहे ही बाब लक्षात येताच महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
नाशिकच्या हॅपी होम कॉलनीत राहणाऱ्या सबा कौसर शेख यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार त्यांची 17 जानेवारीला सव्वा दोन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये समोर ऑनलाइन भामट्याने वीज वितरण कंपणीचा प्रतिनिधी असल्याचे म्हंटले होते.
त्यानुसार सबा या बिल भरण्याच्या संदर्भात बोलत असतांना समोरील व्यक्तीने काही प्रोसेस करावी लागेल म्हणून सांगितले, त्यानुसार सबा यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊ टीम व्ह्यूअर हे ॲप डाऊनलोड केले होते. त्यावरूनच महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे.
इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने महिलेच्या बँकेचे आय डी आणि पासवर्ड मिळवून बँकेतून 2 लाख 13 हजार 499 रुपये लंपास केले आहे. महिलेला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर महिलेने सायबर पोलिसांना संपूर्ण हकिगत सांगितली असून त्यावरून महिलेची फिर्याद घेण्यात आली असून सायबर पोलिस अधिकचा तपास करीत आहे. ज्या मोबाईलवरून संपर्क झाला त्या मोबाइल क्रमांक सहित ज्या खात्यावर पैसे वर्ग केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली हे या गुन्ह्याचा तपास करीत असून तपासात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र वेळोवेळी जनजागृती करूनही लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी कसे पडतात हा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.