नाशिक : नाशिक – पुणे महामार्गावर सिन्नर जवळ एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रपटाला साजेशी अशी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान महामार्गावर थरार रंगला होता. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे धावती कार चोरट्यांनी पळवून नेली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, घडलेली घटना ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहे. गाडीचा पाठलाग करत मारहाण करत गाडी पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदूर शिंगोटे परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा होऊ लागली आहे. त्यातच रात्रीचा प्रवास करावा की नाही याबाबत पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील चेहडी भागातील दोन गॅरेज व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. दौंड येथून नाशिककडे येत असतांना त्यांची धावती कार चोरट्यांनी पळवली आहे. पेट्रोल भरून सिन्नरच्या दिशेने येत असतांना पाठीमागून भरधाव वेगाने कार आली आणि आडवी लावली.
गॅरेज व्यावसायिकांना चौघा चोरट्यांनी थांबण्यास भाग पाडले. कारच्या खाली उतरत गॅरेज व्यासायिकांना मारहाण सुरू केली. त्यामध्ये गॅरेज व्यावसायिक भीतीने कारच्या बाहेर पडत अंधारात पळाले. किल्ली तशीच राहिल्याने चोरट्यांनी गाडी घेऊन नाशिकच्या दिशेने धूम ठोकली.
स्कोडा कार मधून आलेल्या चौघांनी गाडी पळवून नेल्याची माहिती गॅरेज व्यावसायिकांनी पोलिसांना कळवली. काही वेळेतच पोलिस ही आले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करत सर्वत्र नाकाबंदी लावली होती. मध्यरात्री पासून पहाटे पर्यन्त पोलिसांचा शोध सुरू होता.
वावी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी चेतन लोखंडे यांच्या पथकाने सर्वत्र तपास केला. जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र गाडीत इंधन असल्याने चोरट्यांनी काही क्षणातच नाशिक हद्द सोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या वावी पोलिस ठाण्यासह सिन्नर एमआयडीसी पोलिस आणि सिन्नर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, महामार्गावरील लुटीची घटना पोलिसांचे टेंशन वाढवणारी असून पोलिसांना या गुन्ह्यात यश येतं का हे पाहणं महत्वाचे ठरेल.