नाशिक : ऑनलाइन पद्धतीने गंडा घालण्याचे दर दिवसाला नवनवीन प्रकार समोर येत असतानाच नाशिकच्या ओझर येथील एअरफोर्स अधिकाऱ्याला नव्या पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेत असताना तब्बल 98 हजार रुपयांना एका ऑनलाइन भामट्याने चुना लावला आहे. नामांकित दवाखान्यातून बोलतो असे सांगत व्हाट्सअप क्रमांक सांगा म्हणून विचारणा केली होती त्यानंतर एयरफोर्सच्या अधिकाऱ्यांने तात्काळ व्हॉटसअप क्रमांकही दिला आणि त्यावर पाठविण्यात आलेल्या लिंकवर माहिती भरली. त्यानंतर पाच रुपये कट झाल्यानंतर अपॉइंटमेंट निश्चित झाल्याची माहिती दिली मात्र त्यानंतर एयरफोर्सच्या अधिकाऱ्याला तब्बल 98 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
सुदेशपाल सोहनलाल हे नाशिकच्या ओझर येथील एयरफोर्स येथे अधिकारी आहेत. त्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास होत आहे. त्यासाठी उपचार घ्यायचे म्हणून त्यांनी एका नामांकित डॉक्टरची ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायचे ठरविले होते.
त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करून मोबाइलनंबर मिळवला आणि कॉल करून अपॉइंटमेंट बाबत विचारणा केली. समोरील व्यक्तीने तुमचा व्हॉटसअप नंबर द्या त्यावर लिंक टाकतो त्यावर माहिती भरा म्हणून सांगितले. सुदेशपाल यांनी त्याबाबत यांनी अगदी तसंच केलं.
त्यानंतर पाच रुपये कट झाल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट निश्चित झाल्याची खात्री होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सुदेशपाल सोहनलाल यांना त्याबाबत खात्री झाली की पाच रुपये कदाचित अपॉइंटमेंटचे घेतले असावे.
मात्र, सुदेशपाल सोहनलाल इथेच चुकले. त्यांनी त्यात यूपीआय नंबर टाकून पैसे भरले होते. त्यानंतर काही वेळेने संबंधित भामट्याने 98 हजार रुपये परस्पर काढून घेतले आहे. त्यानंतर सुदेशपाल सोहनलाल यांनी तात्काळ त्या नंबर वर फोन केला असता त्यावरून कुठलाही प्रतिसाद येत नव्हता.
सुदेशपाल सोहनलाल यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. ओझर पोलिसांनी सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या माध्यमातून तपास केला जात असून या गुन्ह्याने पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.