नाशिक : अनेकदा असं म्हणतात की मैत्रित पैशाचे व्यवहार करू नये. त्यामुळे चांगल्या मैत्रीत कटुता निर्माण होते. त्यामुळे मैत्रीत आर्थिक व्यवहार नकोच म्हणून अनेक जण व्यवहार टाळत असतात. पण, काही यापेक्षा उलट असतात. जर संकटात कमी पडला नाहीतर ती मैत्रीच काही कामाची नाही असे म्हणतात. त्यामध्ये आर्थिक व्यवहार करतात. आणि ते कुठलीही कटुता निर्माण होऊ न देता, आर्थिक देवाणघेवाण पूर्ण करत असतात. त्यामुळे मैत्रीचे अनेक चांगली वाईट उदाहरणे असतात. नाशिकच्या देवळा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मैत्रीच्या बाबतची चर्चा होऊ लागली आहे.
मैत्रित आर्थिक व्यवहार करणे दोघा मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातउसनवारीने घेतलेले पैसे परत करावेत असा तगादा लावल्याने देवळा येथील तरुणाने आत्महत्या केली आहे. हर्षल संजय गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
यावरून नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी देवळा पोलिस ठाण्यात संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये देवळा तालुक्यातील तिसगाव येथील प्रवीण आहेर तर मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अमोल निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल गायकवाड याने संशयित आरोपी अमोल निकम आणि प्रवीण आहेर यांच्याकडून 21 लाख रुपये हातउसनवारीने घेतले होते. त्यामध्ये त्याने त्यात काही चेक दिले होते. मात्र ते चेक न वठल्याने संशयित आरोपी यांनी फोनवर आणि प्रत्यक्ष भेटून पैशाची मागणी करत धमकी दिली होती.
उसनवार पैसे न देऊ शकल्याने हर्षल गायकवाड याने आपल्या राहत्या घरी शनिवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून देवळा पोलिस अधिकचा तपास करत आहे.
यामध्ये प्रवीण आहेर यास रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. तर अमोल निकम हा फरार असून देवळा पोलिस त्याच्या मागावर आहे. हर्षल गायकवाड हा एकुलता एक मुलगा होता. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने हलहळ व्यक्त केली जात आहे.