नाशिक : खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागासह शहरी भागातील एटीएम सुरक्षेचा मुद्दा प्रलंबित आहे. बहुतांशी ठिकाणी एटीएम फोडीच्या घटना वारंवार घडत असतांना एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच नाशिकच्या ओझर येथे एक एटीएम फोडीची घटना घडली आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे चोरांनी रेकी करून हे एटीएम फोडल्याचे दिसून येत आहे. मुंबई आग्रा महामार्गाच्या सायखेडा फाट्यावर असलेल्या कॅनरा बँकेची शाखा आहे. त्याच्याच बाजूला एटीएम देखील आहे. आणि हेच एटीएम चोरांनी मध्यरात्री फोडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एटीएम सुरक्षेचा मुद्दा समोर आला असून सुदैवाने पैसेच नसल्याने रक्कम चोरांच्या हाती लागली नाही.
असं फोडलं एटीएम
ओझर येथील एटीएममध्ये एक जण सुरुवातीला गेला. त्यावेळी त्याने मास्क लावलेला होता. त्यानंतर काही वेळाने बाहेरचा अंदाज घेऊन दुसऱ्या एका चोराने प्रवेश केला. त्यावेळी तो एटीएममध्ये येत असतांना त्याने लोखंडी गज आणले होते. त्यानंतर त्याने थेट एटीएमच्या लॉकसह दरवाजा तोडला. मात्र, त्यात पैसे नसल्याने चोरांची निराशा झाली.
चोरटे रिकाम्या हाती का परतले?
खरंतर रेकी करून एटीएम फोडण्याचा डाव होता. एटीएम फोडण्यात चरोटे यशस्वी झाले होते. मात्र, यामध्ये सलग तीन दिवस सुट्टी आल्याने त्यात पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे पैसे नसल्याने चोरट्यांचा डाव यशस्वी झाला नाही.
एटीएम फोडीची घटना बघता अशा घटना वारंवार घडत आहे. एटीएम फोडीची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही नाशिक शहरात जिथे रात्रीच्या वेळी नागरिकांचा वावर नसतो अशा ठिकाणी एटीएम फोडण्यात आले आहे.
खरंतर ही संपूर्ण घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली आहे. एक व्यक्ति पैसे काढण्यासाठी बँकेत गेला असता त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने जागा मालकाला ही बाब कळवली त्यानंतर त्यांनी बँकेला ही बाब कळवली आहे.
याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अधिकचा तपास केला जात आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली असता अद्याप कुठेलेही धागेदोरे हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.