नाशिक : झाडांना खिळे ठोकणे, जाहिरात फलक लावण्यासाठी असेल किंवा झाडांवर लाईटिंग माळ टाकण्यासाठी खिळे ठोकले जातात. खरंतर यामुळे झाडांना इजा पोहचत असते. विद्रूपीकरण करण्यासाठी सर्रासपणे झाडांना इजा करण्याचे प्रकार दिसून येतात. मात्र, त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. खरंतर ती साधारण बाब असल्याचा समज नागरिकांच्या मनात आहे. मात्र, असे अजिबात नाही. तो एक गंभीर गुन्हा आहे. पालिकेच्या माध्यमातून गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये हॉटेल आणि शोरूमचा समावेश असल्याने व्यासायिकांणा नाशिक महानगर पालिकेने दणका दिल्याचे बोलले जात आहे.
ग्रो वेल्थ एजन्सीच्या वतीने प्लॉट विकण्याची जाहिरात करण्यासाठी फलक रस्त्यावर असलेल्या झाडांवर खिळे ठोकून लावले होते. त्यानंतर पीवर ग्रीन ऑल लिव्हज, रेड चिली, दि क्लिस्टो मल्टी कझिन आणि बॉबीज हॉटेल या हॉटेल्सकडून जाहिरातीकरिता झाडांवर लायटिंग केली आहे.
तर दुसरीकडे थत्तेनगर येथील क्रोमा शोरूमच्या वतीने झाडांवर फलक लावून जाहिरात केली आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या उद्यान निरीक्षकांनी कारवाई केली आहे. महापालिकेच्या वतीने उद्यान निरीक्षकांना हे अधिकार दिले असून शहरभर ही मोहीम राबविली जाणार आहे.
खरंतर जाहिरात करण्यासाठी अनेक जण पालिकेचा कर चुकवण्यासाठी विविध झाडांवर झोटे फलक लावतात. त्यासाठी झाडांना थेट खिळे ठोकले जातात. तर काही हॉटेल्स व्यावसायिक जाहिरात करण्यासाठी झाडांवर लायटिंग माळ टाकतात त्यासाठी खिळे ठोकतात.
खरंतर खिळे ठोकल्याने झाडांना इजा होते. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान विभागाने असे कृत्य करणाऱ्यावर थेट पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली असून कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिकमध्ये पालिकेच्या या भूमिकेचा अनेकांनी धसका घेतला आहे.
नाशिक महानगर पालिकेतील उद्यान विभागाचे निरीक्षक याबाबत आपल्या काही कर्मचाऱ्यांसह पाहणी करत असून कारवाई करत आहे. त्यामुळे पुढील काळात झाडांना इजा पोहचेल असे कृत्य करू नका असेही म्हंटले आहे.