नाशिक : छोट्या मोठ्या वस्तु चोरणे, दुचाकी चोरणे यांसह मोबाईल चोरणे अशा घटना अलिकडच्या काळात काही नवीन नाही. आणि सहजरित्या या चोरीच्या घटना घडत असतात. त्यामुळे जनमानसात या चोरी बद्दल विशेष असं काही वाटत नाही. मात्र, एखादी महागडी कार चोरी झाल्याने त्याबद्दल विशेष असं वाटत असतं. त्यात ती कार कशी चोरली याबद्दल चर्चा सुरू होत असते. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर या गावात घडली आहे. अवघ्या काही मिनिटांत जळगाव नेऊरमधून गाडी चोरी झाल्याचा प्रकार झाल्यानं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी याच गावात बॅंक फोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव नेऊर येथे पैठणीचे हब आहेत. त्यातील साई माऊली पैठणीचे मालक प्रकाश किसन शिंदे यांची गाडी चोरीला गेली आहे. साधारणपणे 20 लाख रुपये किमितीची टोयोटा कंपनीची सफेद रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी चोरीला गेली आहे.
गाडीच्या चालकाच्या मागील बाजूच्या दरवाजाची काच फोडली, चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. गाडीच्या सिस्टममध्ये काहीतरी छेडछाड केली आणि गाडी घेऊन नाशिकच्या दिशेन धूम ठोकली.
दुसऱ्या दिवासी शिंदे यांना शिर्डी येथे दर्शनासाठी जायचे होते. त्यामुळे पहाटे दररोजच्या पेक्षा लवकर उठून नेहमीच्या सवयी प्रमाणे शिंदे यांनी सीसीटीव्ही पाहणी केली. त्यामध्ये सर्व पाहणी करत असतांना त्यांना सीसीटीव्हीमध्ये आपली गाडीच दिसली नाही.
त्यामध्ये त्यांनी पाहणी करत असतांना क्रेटा गाडीत पहाटेच्या वेळेल्या काही चोरटे आले होते. त्यांनी गाडी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अवघ्या दहा मिनिटात गाडीत केलेली छेडछाड चक्रावून टाकणारी आहे.
गाडी चोरीच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी गाडीची चोरीची नोंद केली असून अधिकचा तपास केला जात असून पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.