मालेगाव ( नाशिक ) : अनेकदा चोर चोरी करायला गेल्यानंतर त्यांची हाती काही लागतंच असं नाही. आणि अनेकदा चोर चोरी करतांना पोलिसांच्या हातीही लागतात. पण सध्या नाशिकच्या मालेगावमधील एक चोरी चर्चेत आली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ही चोरी उघडकीस आली आहे. खरंतर काही महिन्यांपासून शहरातून ग्रामीण भागाला जोडलेल्या रस्त्यावर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकीवरुण येऊन जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींच्या खिशातून मोबाइल आणि पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार समोर आले होते. त्यातच एका चारचाकी चालकांचा मोबाईल हिसकावण्याच्या नादात चोरांच्या हाती घबाड लागल्याची बाब समोर आली आहे.
मोबाईल चोरीचा उद्देश ठेऊन चारचाकी जात असतांना तिला अचानक दुचाकी आडवी लावली. दुचाकी वरुन उतरलेल्या तिघांनी मोबाईल आणि पैसे देण्याची मागणी केली. यामध्ये चोरट्यांनी गाडीत ठेवलेल्या पिशव्या आणि इतर साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान चोरांच्या हाती पिशवीत ठेवलेले पैसे हाती लागले. आणि चोरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मोबाईल लुटीचा उद्देश असलेल्या चोरांना लाखो रुपये मिळाले. त्यामुळे चोरांनी पैसे हाती लागताच तिथून पळ काढला.
रस्त्यावर लूट करण्याचे प्रकार सुरू असतांना हा पैशांची लूट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये गिगाव सिताणे येथील रस्त्यावर ही घटना घडली असून तब्बल अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. सुरेश रामदास जाधव यांची यामध्ये लूट झाली आहे.
त्यांच्या स्विफ्ट कारने ते गावी जात असतांना त्यांना अडवून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यावेळेला चोर आणि जाधव यांच्यात झटापट झाली. त्यामध्ये चोरांनी पैसे चोरून घेत पोबारा केला. यावरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवसेंदिवस या चोरीच्या घटना घडत असून मोबाईल चोरांचा सध्या सुळसुळाट पाहायला मिळत आहे. घटनेनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र अद्याप हे चोर हाती लागले नाहीये. पोलिस आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.