इगतपुरी, नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिकचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कारवाया. सिन्नर येथे दोन दिवसांत दोन अधिकारी लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले होते. त्यानंतर बुधवारी इगतपुरीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यापूर्वीही नाशिकमध्ये लाचखोरीचे प्रकरण समोर येत होते. त्यामुळे नाशिक संपूर्ण राज्यात लाचखोरीने गाजत होते. असे असताना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. महावितरण कंपनीचा घोटी वैतरणा विभागात असलेला लाचखोर सहाय्यक इंजिनिअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे महावितरणातील अन्य लाचखोरांचे देखील धाबे दणाणले आहेत.
सचिन माणिकराव चव्हाण असे लाचखोर महावितरणच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने नाशिकच्या एसीबीकडे तक्रार केली होती. त्या व्यक्तीचा वॉटर प्युरिफिकेशन प्लान्ट आहे. या व्यक्तीला त्याच्या इलेक्ट्रिक मीटरवर वाढीव लोड मंजूर करुन हवा होता.
त्या मंजूरी करिता महावितरण कंपनीकडे संपर्क केला होता. त्यानंतर लाचखोर चव्हाण याने भेट घेऊन चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने ही कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महावितरणातील लाचखोर सहाय्यक इंजिनिअर सचिन चव्हाण याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी लाचखोर चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुखदेव मुरकुटे, प्रणय इंगळे यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईनंतर महावितरण मधील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.