चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : कॅटरिंगच्या कामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून परराज्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला 80 हजारात विकण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने हुशारी दाखवल्यामुळे तिची यातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी एका महिला एजंटसह एकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत. या माध्यमातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एका महिलेने तिला आळंदी येथे नेले. तिथे 80 हजारात तिचा सौदा करत हैदराबाद येथील तरुणाशी बळजबरीने विवाह लावला. त्यानंतर त्या मुलीस हैदराबाद या ठिकाणी नेऊन डांबून ठेवले. मुलीने मात्र हुशारी दाखवत ‘तुम्ही माझा घरी चला.. माझ्या घरच्यांना सांगा’ असं सांगत त्यांना घेऊन पुणे या ठिकाणी आली. त्या ठिकाणी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी तिला विचारणा केली. त्यावेळेस मुलीने परिस्थिती सांगितल्यानंतर पुण्याच्या नागरिकांनी मुलीच्या भावाशी संवाद साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तातडीने मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे मुलीने आपबिती सांगितली.
परराज्यात मुलीला नेत तिची विक्री करणे आणि लग्न लावून देणारे असे आणखी काही प्रकार या संशयितांनी केले आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यातून मुलींना विक्री करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या मुलीबाबत जे घडले ते इतर कोणासोबत घडू नये, यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.