नाशिक : नाशिकच्या घोटी येथे नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातील काळ्या बाजाराचे कनेक्शन देखील समोर आले आहे. खरंतर तांदळाचं मोठं कोठार म्हणून घोटी परिसरात ओळखला जातो. याच ठिकाणी एका मोठ्या व्यापाऱ्याच्या गोदामात काळ्या बाजारातील तांदूळ येणार असल्याची माहिती नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. मे. भाकचंद केशरमल पीचा यांच्या राईस मिलमध्ये ही कारवाई करण्यात आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोबत घेऊन पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी ही कारवाई केली आहे.
मे. भाकचंद केशरमल पीचा यांच्या राईस मिलमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातून दाखल होताच ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड येथील हे कनेक्शन समोर आले आहे. दुकानांतून जमा केलेला तांदूळ या मिलवर आणण्यात आला होता.
लाखो रुपयांचा तांदूळ टेम्पोच्या सहाय्याने नाशिकच्या घोटी येथे आणण्यात आला होता. त्याच दरम्यान कारवाई झाल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रेशन तांदूळ थेट मिलमध्ये विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
इगतपुरी येथेल मिल राईस मध्ये रेशनचा जुना तांदूळ दाखल झाला होता. त्यामध्ये मिल मध्ये दाखल झाल्यावर तो खुल्या बाजारात विक्रीला येणार होता. अशातच नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत तांदळाचं गौडबंगाल समोर आणलं आहे.
जवळपास 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा हा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. मिल मालक तुषार नवसुखलाल पीचा, टेम्पो चालक विलास फकीरा चौधरी आणि केडगाव येथील चेतन ट्रेडींग कंपनीचे मालक तथा ब्रोकर सिंघवी यांच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.