नाशिक : खरंतर उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी विहीर खोदण्याचे काम केले जाते. अशीच सुरुवात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिरडी गावात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. मात्र, तिथं जे घडलंय ते धक्कादायक असून ट्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. विहीर खोदत असतांना दगडाचा भाग लागला की तो खोदण्यासाठी बार उडविण्याची प्रक्रिया केली जाते. त्याला काही ठिकाणी फायर उडविणे असेही म्हणतात. त्याच दरम्यान हिरडी गावात मोठा अपघात घडला आहे. ग्रामपंचायतीसाठी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काही परप्रांतीय कामगार काम करत होते.
तीन कामगार काम करत असतांना अचानक बार उडाला त्यामध्ये तीन कामगार विहीर पडू मृत्यू मुखी पडले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ही घटना घडली असून रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. खरंतर बार लावून ठेवण्यात आला होता. तो नंतर उडविला जाणार होता. पण त्याआधीच तो उडाल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला जखमींना गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी नेले. तिथे परिस्थिती लक्षात येताच त्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून थेट जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. तिघांना तपासून मृत घोषित केले तर एकावर उपचार सुरू आहे.
खरंतर ही प्रक्रिया काहीशी अवघड आणि जुन्या पद्धतीने केली जाते. हा बार उडविण्यात आला की उडाला याबाबत दोन प्रवाह असून याबाबत स्थानिक पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत कुठलाही गुन्हा दाखल नसला तरी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परप्रांतीय कामगारांचा मृत्यू स्फोट झाल्यामुळे घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत त्यांच्या मूळ गावी अद्याप माहिती देण्यात आली नसून संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.