नाशिक : सोशल मिडिया हाताळत असतांना अत्यंत काळजीपूर्वक हाताळा नाहीतर तुमची फसवणूक अटळ आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे कुठे ना कुठे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक विशेष बाब म्हणजे नाशिकमधील एका महिलेला सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीला लाईक करणं चांगलेच महागात पडले आहे. पाच लाखाहून अधिक रकमेची महिलेची फसवणूक झाली होती. सप्टेंबर 2022 मध्ये घडलेल्या या घटनेच्या आरोपीला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे.
नाशिकमधील सविता पवार नावाच्या महिलेचा कॉस्मेटिक प्रॉडक्टचा व्यवसाय आहे. त्याच्यानुसार त्या सोशल मिडियावर जाहिरात बघत असतांना त्यांनी इन्फो इंडिया प्रा. लि. या पेज ला लाईक केले होते. त्यामध्ये त्यांनी जाहिरात करण्याच्या अनुषंगाने काही रक्कम सांगितली होती.
व्यवसायात वृद्धी होण्याच्या दृष्टीने महिलेने संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीवरुन लागलीच एक रुपया भरला आणि तिथेच महिलेची चूक झाली. महिलेने संपूर्ण मोबाइलचा ताबाच संबंधित व्यक्तीला दिला आणि त्यानंतर वेळोवेळी संबंधित व्यक्तीने महिलेच्या खात्यातील पैशांना चुना लावला.
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर महिलेने नाशिकच्या सायबर पोलिसांत धाव घेलती होती. त्यानुसार महिलेने तक्रार देत संपूर्ण हकीकत सांगितली होती. नाशिकच्या सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता.
नुकतीच याबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. गाझियाबाद येथून फसवणूक केलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी संशयित आरोपी कंपनीचे डायरेक्टर नितीश कुमार, राम राघव यांना कोर्टात हजर केले होते त्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
तांत्रिक बाबींच्या माध्यमातून नाशिकच्या सायबर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यामध्ये नाशिकच्या सायबर पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.