नाशिक : खरंतर चोरी करण्यासाठी अनेक चोर वेगवेगळी शक्कल लढवत असतात. यामध्ये नुकत्याच नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या इंदिरानगर येथे एका रिक्षाला कट मारल्याची कुरापत काढून चार जणांनी शनिवारी एका व्यक्तीला लुटले होते. सुभाष पाळेकर असं त्यांचं नाव होतं. त्यामध्ये त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांची चार चाकी कार लुटत पोबारा केला होता. त्यामध्ये नाशिक शहर पोलिसांनी तपास करत असतांना सीसीटीव्हीचा आधार घेऊन पोलिसांनी चौघांना जेरबंद केले होते. याच चोरीचा तपास करत असतांना त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेला फंडा ऐकून पोलिस देखील चक्रावले आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने ही कारवाई करत असतांना अनेक गुन्हे उघडकीस आले. यामध्ये लूट करण्यासाठी कट मारल्याची कुरापत काढत असल्याची कबुली दिली आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने लूट करणाऱ्या संशयित आरोपी युनिस उर्फ अण्णा आयुब शहा , वशीम बसीर सैयद , गुलाम सादीक मोंढे यांना अटक केली आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिसांच्या तपासात आणखी काही संशयित हाती लागल्याची शक्यता आहे.
या गुन्ह्याची उकल वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, यांसह हेमंत तोडकर, रविंद्र बागूल, प्रविण वाघमारे, विशाल देवरे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ यांनी केली असून या कारवाईनंतर पोलिस दलाचे कौतुक होत आहे.
यामध्ये या चोरट्यांकडून नाशिक पोलिसांनी एक कार, रिक्षा, मोबाईल, पांढरी अंगठी यांसह रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलिसांनी केलेली ही कारवाई बघता आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान लूट करण्यासाठी गाडीला कट मारल्याची कुरपात काढणे. जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लूट करणे. वेळप्रसंगी थेट कारच पळवून नेने ही बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.