नाशिक : नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिलेल्या एका तक्रारीवरून खळबळ उडाली आहे. नाशिकमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची फसणवुक झाल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांवरील संकट काही केल्या दूर होत नाहीये. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांवर सुरूच आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची व्यापऱ्याने लूट केल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. व्यापारी पैसे घेऊन फरार झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरंतर बाजार समितीत शेतमाल विक्रीला आणला तर व्यापारी पैसे देण्यासाठी बांधील असतो. त्याची संपूर्ण नोंद ही बाजार समितीत असते. त्याद्वारेच त्याला शेतमाल खरेदी करता येतो. मात्र, असे असतांनाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसणवुक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना निवेदन देत पैसे मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सचिवांनी व्यापाऱ्याला नोटिस बजावली होती. मात्र, कुठलाही प्रतिसाद न मिळल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
यामध्ये नाशिकच्या पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट मध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून भाजीपाला, फळभाज्या विक्री साठी येत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी विक्री होत असतो. त्याच दरम्यान ही फसवणूक झाली आहे.
टोमॅटो व्यापारी नौशाद फारूकी आणि समशाद फारूकी यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची खरेदी केली होती. त्यात त्यांनी शेतमाल खरेदी केला मात्र पैसे दिलेच नाही.
यामध्ये टोमॅटो व्यापऱ्याने काही शेतकऱ्यांना धनादेश दिले होते. त्यांचे धनादेश पैसे नसल्याने वठले नाहीत. तब्बल पावणेदोनशेहून अधिक शेतकऱ्यांची यामध्ये व्यापऱ्याने 1 कोटी 80 लाख रुपयांची फसणवुक केली आहे.
दरम्यान शेतकरी यामध्ये आधीच पिचलेला असतांना पुन्हा अशी व्यापऱ्यांकडून फसवणूक होत आहे. त्यात व्यापारी बाजार समितीला देखील जुमानत नाही. त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करून यांचे पैसे द्या अशी मागणी केली जात आहे.