नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुणाचा निष्पाप बळी गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खरंतर नितीन जाधव हा मुलगा रस्त्याने जात असतांना त्याला रस्त्यात मोबाईल सापडला होता. त्यानंतर त्या मोबाईलवर फोन आल्यानंतर त्याने रिसिव्ह केला. मोबाइलवर त्याने मला मोबाइल सापडल्याचे कळविले होते. त्यानंतर त्याच्याशी बोलून त्याला मोबाईल द्यायला गेल्यानंतर फोनवर बोलत असलेल्या दाम्पत्याने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास सुरू आहे.
खरंतर नितीन जाधव या तरुणाला शुक्रवारी मोबाईल सापडला होता. त्यातून त्याने फोन केला असता एका व्यक्तिचा असल्याचे समोर आले. तो मोबाइल परत देण्यासाठी सिडको येथील त्रिमूर्ती चौकातील रुग्णालयात गेला होता.
त्याच वेळी तिथे ज्या व्यक्तिने फोन केला होता तो नीलेश ठोके त्याचा मित्र प्रसाद मुळे आणि नीलेश याची पत्नी हिच्या सह काही पुरुषांनी नितीन जाधव याला बेदम मारहाण केली. याच वेळी महिलेस फोन का करतो म्हणून लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे.
मारहाणीच्या घटनेत नितीन गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मेडिकल कॉलेज येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रामाणिकपणे रस्त्यावर सापडलेला मोबाईल द्यायला गेल्यानंतर घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची अंबड पोलिस तपास करत असून तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान नितीन जाधव या मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरुण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बिजली यांच्याकडून अधिकचा तपास केला जात आहे.
या घटणेनंतर प्रामाणिकपणा दाखवावा की नाही अशी चर्चा शहरात होऊ लागली असून या प्रकरणात पोलिस काय तपास करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील अंबड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे.