नाशिक : सध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा चढत असुन जवळपास 40 डिग्रीच्या वर असल्याने शितपेय, फळे, आईसक्रिम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्स याची मोठयाप्रमाणे बाजारात विक्री होत आहे. नागरिकांची मोठी गर्दी अशा ठिकाणी दिसून येत असून तापमानापासून दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाला काही संशय आला आहे. पूर्व इतिहास पाहता ठिकठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही शीतपेयांच्यासहित फळ विक्री करणाऱ्या ठिकाणी कारवाई करत तपासणीसाठी काही साठा जप्त केला आहे.
नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ठोस मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन शरदचंद्र पवार मार्केट या ठिकाणी श्री शारदा फ्रुटस कंपनी, एपीएमसी मार्केट, पेठरोड, पंचवटी, नाशिक या ठिकाणी धडक कारवाई केली आहे.
विक्रीसाठी साठविलेल्या आंबा आणि आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे इथलीन रायपनर सॅचेटस चे नमुने घेण्यात आले आहे. त्यानंतर ओझर येथे व्ही.ए.एन.सी. एजन्सी, ओझर येथे विक्रीसाठी साठविलेले शितपेय जप्त केले आहे.
त्यामध्ये थम्सअप, मँगो ड्रिंक्स, माझा आणि स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेवुन स्टिंग एनर्जी ड्रिंक्सचा मोठा साठा जप्त केला आहे. त्यानंतर व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स, मालेगांव येथेही फ्रोझन डेझर्ट यांचा नमुना घेवुन विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेला आहे.
दिंडोरीच्या जऊळके येथील आकाश एजन्सी येथे धाड टाकत स्टिंग कॅफिनेटड विव्हरेज, थम्सअप चार्ज कॅफिनेटड बिव्हरेज व मॉनस्टर कॅफिनेटेड विव्हरेज चे नमुने घेवुन मोठा साठा जप्त केला आहे.
ज्या ज्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहे. तेथील नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाला असून सदरची धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे. या कारवाईनंतर बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.