मनोहर शेवाळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव | 12 ऑक्टोबर 2023 : पैशांचा हव्यास वाईट… पैशांमुळे जीवन सुसह्य होत असलं तर पैसा हेच काही जीवन नाही. पण बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही आणि ते पैसे कमावण्याच्या मागे जीव तोडून धावतात. बर स्वत: मेहनत करत असतील तरी ठीक पण आपली भरभराट व्हावी म्हणून आपल्या पार्टनरकडून, विशेषत: पत्नीकडून, तिच्या माहेरच्यांकडून पैसे मागणे हा तर सरळसरळ हुंडाच झाला. त्यापायी आत्तापर्यंत कितीतरी जणींनी त्रास सहन केला, जीवही गमावला.
जग चंद्रावर पोचलं तरी पैशांसाठी मुलीबाळींना जीव गमवावा लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशीच एक दुर्दैवी आणि तितकीच घटना नांदगाव येथे घडली आहे. तेथे पिता-पुत्राने संगनमताने सुनेची हत्या केली आणि त्याला अपघाता मृत्यूचं स्वरूप देण्याच प्रयत्न केला. मात्र १५ दिवसांनी या खुनाला वाचा फुटली आणि त्या नराधम आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चोख प्लानिंग करून केला गुन्हा
२७ सप्टेंबर रोजी मन्याड फाटा या ठिकाणी एका दुचाकीचा अपघात होऊन महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. लेकीच्या अकस्मात मृत्यूमुळे तिचे कुटुंबीय खचले होते. त्यांच्या पतीलाही खूप दु:ख झाले. पत्नीच्या आठवणीत तो अगदी व्याकूळ झाला होता. मात्र हा फक्त मुखवटा होता, त्या मागचा भीषण , भेसूर चेहरा समोर आला आणि…
बापलेकानेच केली हत्या
मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीच्या अपघातात पत्नी, भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे पती डॉ. किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता. मात्र मृत्यूनंतर १५ दिवसांनी एक नवा उलगडा झाला आणि हा अपघाती मृत्यू नसून प्रॉपर प्लानिंग करून केलेली हत्या झाल्याचे समोर आले. भाग्यश्रीचेचे पती डॉ. किशोर यांना दवाखाना बांधायचा होता. त्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आण अशी मागणी ते पत्नीकड यांच्याकडे करत होते, मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे डॉ. किशोर आणि त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे या बापलेकाने संगनमताने तिची हत्या घडवून आणली. त्यानंतर त्यांनी अपघाताचा बनाव रचला, असा आरोप करत भाग्यश्रीच्या भावाने तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांच्या कठोर तपासानंतर त्यांचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि सासरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.