नवी मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्ह्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गुन्ह्याची अशीच एक खळबळजनक घटना नवी मुंबईमध्ये घडली. तेथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीचे अपहरण (kidnapping case) करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कसून तपास करत अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यासाठी त्यांनी १५० हून अधिक सीसीटीव्हींचे फुटेजही (scanned CCTV Footage) तपासले. अखेर आरोपीला दारवे गावातून अटक ताब्यात घेण्यात आले आणि त्या चिमुकल्या मुलीची सुखरूप पण सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणी थॉमस असे आरोपीचे नाव असून तो 74 वर्षांचा आहे. अपहृत मुलगी ही नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहते. दोन दिवसांपूर्वी ती तिच्या भावंडासोबत खेळत असताना, आरोपी थॉमसने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवले आणि तिला घेऊन गेला. मुलगी बराच वेळ न सापडल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.
सीनिअर इन्स्पेक्टर तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले व आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. आरोपीचा व लहान मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी त्या भागातील जवळपास 150 सीसीटीव्हीच्या फुटेजचा तपास केला. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी एकामागोमाग एक अशा रिक्षा बदलत होता.
अखेर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी करावे गावात शनिवारी सापळा रचला. आरोपी थॉमस त्या जाळ्यात अलगद अडकला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अपहरण करण्यात आलेल्या लहान मुलीची सुखरूपपणे सुटका करून पोलिसांनी तिला तिच्या पालकांकडे सोपवले.
मूल नसल्याने केले अपहरण
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मणी थॉमसची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने अपहरणाचा गुन्हा कबूल केला. त्याच्या सांगण्यानुसार, त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. मात्र तिला मूल होऊ शकत नसल्याने त्याने या छोट्या मुलीचे अपहरण केले, अशी सबब त्याने सांगितली. मात्र ही गोष्ट कितपत खरी आहे याचा पोलिस अद्याप शोध घेऊन आरोपी हा मानवी तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी आहे का, याचाही पोलिस कसून तपास करत आहेत.